Sunday, July 5, 2020

गुरु

                                                            गुरु


आपल्या जीवनात आपल्याला शिकवणारे कित्येक जण भेटतात.  कुणी  तरी चालायला शिकवते, कुणी बोलायला. कुणी अक्षर ओळख करून देते. कुणाकडून आपण गणित, विज्ञान शिकतो. तर काही जण आपल्यावर चाली रीतींचे संस्कार करतात. आणि कित्येकशा गोष्टी आपण स्वतःहून शिकतो. काही निरीक्षणातून, काही अनुभवातून, काही वाचनातून, काही प्रयोगातून तर काही अंदाजातून. ठरवले तर शिक्षणाची प्रक्रिया हि अखंडपणे चालत राहू शकते. नाही तर एखादी degree मिळाली कि आत्मा संतुष्ट होऊन शिकणेच  थांबू शकते. आणि मग आपण अधिकारवाणीने सगळ्याच गोष्टींवर भाष्य करू लागतात. आपल्या आजूबाजूला असे पुष्कळ जण भेटतील.  म्हणूनच थोडे गाणे शिकले कि इतरांना शिकवणी घेणारे विद्वान गायक कित्येक भेटतीलच. अगदी लहान वयातच गीता, ज्ञानेश्वरी मुखोद्गत करून प्रवचने देणारे हि काही भेटतील. हे करणे योग्य कि अयोग्य हा प्रश्न वेगळा. पण इतरांना शिकवण्याची प्रचंड उर्मी आम्हा सर्वांच्या मनात जागी असते हे खरे.  त्यातूनच आपल्याला जीवनातले गुरुचे महत्व जाणवते. कारण गुरु ला महत्व नाही दिले तर आपल्याला कोण विचारणार?

           प्रत्यक्षात मात्र गुरुचे महत्व असण्याचे कारण पूर्णपणे उलटे आहे. जेव्हां आपण प्राथमिक गोष्टी शिकून जीवनाचा , स्वतःचा शोध घेऊ लागतो. आणि स्वतःचे जीवनातले उद्दिष्ट ठरवू लागतो तेव्हा अनेक प्रश्नांचे डोंगर आपल्या समोर उभे राहतात. त्या प्रश्नांची उत्तरे कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये बंदिस्त झालेली नाही आहेत. त्या प्रश्नांशी होणारा झगडा हा आपला स्वतःचाच उरतो. अशा वेळीच एखादा विवेकानंद गुरुच्या शोधात निघतो. एखादा भीमसेन गाणे शिकण्यासाठी घर सोडून गुरूच्या घरात आश्रय घेतो किंवा कट्यार काळजात घुसली नाटकातला ( चित्रपटातला नव्हे ) नायक खान साहेबांच्या घराबाहेर जाऊन त्यांचा रियाझ  ऐकत बसतो. जेव्हा स्वतः आपण शोध घेऊ लागतो  तेव्हा गुरु ची खरी गरज भासू लागते. एखादा थोपवलेला गुरु हा खरा गुरु असेलच असे मात्र नाही.साधनेची तयारी असलेला शिष्य आणि त्याला हवे ते देऊ शकणारा गुरु असेल तरच तसे नाते तयार होऊ शकते. नाही तर स्वघोषित गुरु आपण सांगतो ते कसे बरोबर हे पटवून देत शिष्याची दिशाभूल करत बसतो. आपल्या समाजात अशांचेच स्तोम वाढलेलं दिसून येईल.  'गुरुविण कोण दाखवील वाट' हे ऐकतच आपण मोठे झालेलो असतो. त्यामुळे आपण गुरु हवाच हे गृहीत धरून एखादा गुरु नेमून घेतो. आणि मग स्वघोषित गुरू शिष्याला गोंधळवण्याचे काम सुरु करतो. म्हणूनच शिष्याने देखील डोळसपणे, चौकसपणे गुरुची परीक्षा घेत राहणे हे तितकेच योग्य.  एकच तर जीवन असते.  परत जन्म होणार असे गृहीत धरले तरी हा जन्म सार्थकी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण केला पाहिजे. त्या मार्गात जर गुरूच अडथळा वाटत असेल तर तो बदलण्यात काहीच वाईट नाही. आणि समजा गुरु मिळालाच नाही तर स्वतःच्या साधनेने हवे ते साध्य एखादा एकलव्य करू शकतो. तो मार्ग खडतर असले, त्यात वेळ लागेल इतकेच. पण अशा वेळी गुरूच्या मर्यादांनी शिष्याला मर्यादित करणे हे योग्य ठरत नाही. गुरुचे खरे काम योग्य मार्ग दाखवणे इतकेच असते. पुढचा मार्ग हा शिष्याने स्वसाधनेने चालू ठेवायचा असतो



गुरु अनेक प्रकारचे असतात. काहींना विशिष्ट विद्यार्थ्यांवर खास प्रेम असते, किंवा त्यांचे पूर्वग्रह  असतात  किंवा त्यांचा अहं असतो आणि त्यामुळे खऱ्या साधकाला शिष्य करतीलच असे नाही.  जसे द्रोणाचार्यांचे अर्जुनावर होते. त्यांचे विद्येवर प्रेम नव्हते. नाही तर त्यांनी एकलव्याला आपल्या पदराखाली घेतले असते.  अशाच काहीशा कारणामुळे कर्ण परशुरामांचा शिष्य होऊ शकला नाही. काही गुरु स्वतःच गोंधळले असतात. मग शब्दच्छल करून आपल्याला खूप काही माहीत आहे असा आव आणत शिष्याना स्वतःच्या पदरी बांधून ठेवतात. पण तिथे पोहोचण्याचा मार्ग ते उलगडवून दाखवू शकत नाहीत. काही गुरु तर ज्ञानाचे चार शब्द वाटून दक्षिण मिळवण्यातच धन्यता मानतात. आपल्या देशामध्ये सगळ्याच  क्षेत्रात असे गुरु भेटतील.  शिष्याने मात्र गुरु बद्दल आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानाबद्दल डोळस आणि चौकस असले पाहिजे. एखादा शिष्य जर पात्र असेल तर तो गुरूच्या पात्रतेला आव्हान देऊ  शकतो. आणि गुरु नाहीच मिळाला तर स्वतःच गुरु बनू शकतो. जोपर्यंत साधकवृत्ती येत नाही तोपर्यंत खऱ्या गुरुची गरज भासत नाही. आणि एकदा ती गरज भासली तर तो सहज मिळत नाही. आणि म्हणूनच गुरु महत्वाचा ठरतो
                                   
अभिजीत कुंभार

Saturday, June 27, 2020

नैराश्याचे द्वंद्व




सरसर सरसर सरून गेले
काळाचे क्षण विरून गेले
पुष्कळसे मन विसरून गेले
कित्येक हातून निसटून गेले
अशांतीचे सूर लावून गेले
तर काही अतृप्त ठेवून गेले

मैत्री नाती उरली आता
कुणी दुखविले जाता जाता
कुणी दुखावले कळता
काही नाती आली जोडता
एकांताचे कायम  शल्य आता
स्मृतीत झुरणे उरले आता


मनी अंतरी उर्मी जागत नाही
आशा आकांक्षा उरल्या नाही
गरज कशाची भासत नाही
कौतुकाचे आता अप्रूप नाही
यशाचे काहीच वाटत नाही
नैराश्याचे  द्वंद्व  सुटत नाही

-           अभिजीत कुंभार

टिवटिव


                                                               
कृष्ण:  मला वाटते मला माझी बासरी बदलली पाहिजे.... 


पेंद्या:  ( फोन मधून डोके बाहेर काढून ) भगवान असे का वाटले तुम्हाला? तुमचे बासरी चे सूर अजूनही तसेच सुरिले उमटतात. हे बघा तुमच्या आजूबाजूला गायी कशा  जमल्या आहेत... 


कृष्ण: ते ठीक आहे रे..  पण?


(फोन वर बीप वाजतो )


 पेंद्या:  (फोन मध्ये पाहात )  पण काय प्रभू?


कृष्णा: पण एक ही गोपिका कशी काय आली नाही?   किती तरी दिवस हे चालू आहे...  


पेंद्या:   देवा कर्म करत राहा... फळाची अपेक्षा करू नका ... 


कृष्ण: ( गांगरून) म्हणजे म्हणायचे काय तुला? अरे…   इतकी चांगली बासरी वाजवतो. त्याचे फळ इतरांना मिळत नाही आहे त्याचे मला वाईट वाटत आहे 

पेंद्या: ( मान हलवत ) कळले देवा कळले...  ( हसत)  तुमच्या मनात काय चालले आहे ते .. कळले.


कृष्ण: ( हिरमुसल्या स्वरात)  म्हणून म्हटले कदाचित बासरीच बदलून बघावी .... 


(फोन वर बीप वाजतो )


पेंद्या: तसे काही नाही देवा...  तुम्ही चिंता करू नका ...  (फोन मध्ये पाहात )  स्थितप्रज्ञ राहा 


कृष्ण: मग असे काय झाले कि कलयुगातल्या गोपिकांना माझी बासरी खेचून आणत नाही पूर्वीसारखी. तुझे पण काय चालले आहे? तुझे माझ्या कडे पूर्ण लक्ष नाही दिसत आहे. मगापासून बघतोय मी त्या यंत्रामधून टिवटिव आवाज येत आहे. आणि तू सारखा त्यात बघत आहेस. काय आहे हे?


पेंद्या:  काही नाही हे आमचे असेच करमणुकीचे साधन आहे..  तुमचे चालू द्या 


कृष्ण: काय चालू द्या?


पेंद्या : करा काही तरी भव्य दिव्य, चमत्कारी असे काहीसे . आम्हाला करू द्या आम्हाला जे जमेल ते 
कृष्ण: म्हणजे?



पेंद्या: तुमचे कसे आहे... तुम्ही काही हि करता ते सगळेच  अगदी  सखोल आणि अगाध असते. तुमच्या बालपणाचा खट्याळपणा, तुमचे बासरीचे सूर, राधे बरोबरचे नाते असू दे..   तुम्ही म्हणजे त्रेता युगातले alpha-male .  सगळे कसे भव्य दिव्य.  आता हेच बघा ना  अर्जुन नुसता म्हणाला कि दादा  मला लढाईत शिरायचे टेन्शन आले आहे. तर तुम्ही आख्खी गीता सांगून टाकली. अहो तेव्हां रणांगणावर भर उन्हात  शस्त्र घेऊन उभ्या असलेल्या सैनिकांचा काही विचार केलात कधी? त्यांची काय अवस्था झाली असेल?  बासरी वाजवून सगळ्या गोपिकांना आमंत्रित करायचा तेव्हाण शेजारी राहणाऱ्या मुलांना काही scope  ठेवला तुम्ही?   
तुमची बासरी ऐकत त्या तुमच्या मागे आणि आम्ही त्यांच्या मागे. आमच्याकडे लक्ष कोण देत होते? सामान्यांचा विचार कधी केलात तुम्ही?


कृष्ण: अरे मित्र तुझा गैरसमज होतो आहे.. 
पेंद्या: देवा तुम्ही कधीच माझ्या सारख्या सामान्य मुलांचा विचार केला नाहीत 
कृष्ण: अरे असे कसे म्हणतोस? आठव बघू आपण गोपाळ काला करायचॊ.. मग विटी दांडू खेळायचो. किती धम्माल करायचो आपण 


पेंद्या:  लहानपणी सगळे ठीक होते हो.. 


कृष्ण :  मग?


पेंद्या:  आपण सगळे वयात आलो आणि तुम्ही सगळे विसरून गेलात 


कृष्ण : असे नाही रे.. मला या जगाची चिंता होती..  म्हणून मला हे सगळे करावे लागले.  


पेंद्या :  वा रे वा ...  जगाची चिंता होती तर माझ्या सारख्या साध्या मित्र ची कधी चिंता नाही वाटली तुम्हाला?


कृष्ण:  नको रे असा गैरसमज करून घेऊ..  आठव आपण लहान पणी  सगळ्यांचा रोष पत्करून कसा लोणी चोरायचो.. त्या लोण्याची शपथ आहे तुला.. सांग काय आहे हे सगळे?


पेंद्या:  देवा तुला मी सांगितले तर तू परत त्यात पारंगत होशील.. आणि आमची अवस्था पूर्वी सारखी होईल.. आता कुठे  सामान्य माणसाला आवाज फुटलाय.  तुम्ही तो पण घेऊन टाकाल 


कृष्णा:  असे नाही होणार.  तुला काय हवे ते सांग.. तुला काही दुःख आहे का?


पेंद्या : देवा तुझा मित्र म्हणून तू सुदामा ला मोठा महाल बांधून दिला पण मला विसरला. 


कृष्ण : ( हसत) मग तुला पण एक बांधून देतो.. 
पेंद्या : नक्की?


कृष्ण: हो नक्की 


 पेंद्या : बघ हां.. हल्ली प्रॉपर्टी चे भाव वाढले आहेत सगळीकडे.. 


कृष्ण: अरे हो हो.. मी देईन तुला मोठा बंगला... मी बोलतो मोंदींशी.. ते पण माझे भक्त आहेत.. नाही म्हणणार नाहीत. एखादी बेनामी प्रॉपर्टी ला तुझे नाव द्यायला सांगतो... 


पेंद्या: Yess .... 


कृष्ण: आता तरी मला मार्गदर्शन करशील?


 पेंद्या:  देवा..  आमच्या सारख्याना आता कुठे जरा आवाज मिळाला आहे. त्याच्या मध्ये तुम्ही ढवळा  ढवळ करणार. आम्ही लहान होतो तेव्हा मत व्यक्त करण्यासाठी एक तरी उच्च शिक्षित असावे लागायचे किंवा अगदी विचारवंत असावे लागायचे.   आता कुठे आमच्या सारख्याना वाचा फुटली आहे.. आम्ही काही व्यक्त केले तर लाख भर लोकांपर्यंत पोहोचू शकतो 


 कृष्ण: याचेच तर मला कुतूहल वाटते आहे. मी या जगाला जगण्याचा मार्ग सांगितला. पण आता पाहतो तर सर्व मनुष्यजात भौतिक आकर्षणामध्ये अशी काही अडकून पडली कि मला कळत नाही कि यांच्यापर्यंत माझा संदेश कसा पोहोचवू 

पेंद्या: गप्प बसा ... तुमचा संदेश म्हणे... अहो किती क्लिष्ट करता कुठला हि संदेश.. किती लोकांनी तुमच्या गीतेवर टीका लिहिली, भाषांतरे लिहिली. तरी अजून आम्हाला कळली नाही ती. तुम्ही संदेश नाही दिला. तर वैचारिक गोंधळ निर्माण केला नुसता.. 


कृष्ण : अरे रे काय बोलतोयस हे.. माझ्या काळजाला वेदना होत आहेत हे सगळे ऐकून. माझ्या बद्दल या जगात काहीच श्रद्धा उरली नाही का?


पेंद्या: तुमच्या वर श्रध्दा, भक्ती सगळे काही आहे. त्याची चिंता नका करू.. एकीकडे TV चॅनेल्स आणि दुसरीकडे तुमची मंदिरे वाढतच आहेत. घरोघरी तुमच्या मुर्त्या आहेत. सगळ्यांना राधा कृष्णा सारखे प्रेम हवे आहे..  जन्माष्टमी ला दही हंडीला थरावर थर चढतात. सगळी कडे कसे भक्तिपूर्ण वातावरण वाढतच आहे. पण ....  


कृष्ण:  पण ?  पण काय?


पेंद्या : कुणाला हे विचारू नका कि तुम्ही गीते मध्ये काय सांगितले आहे?
 कृष्ण : (छाती वर हात ठेवून कळवळून ) हे काय ऐकतो आहे मी?


पेंद्या:  देवा... तुम्ही स्थितप्रज्ञ राहा. भावनांवर नियंत्रण ठेवा.. तुम्ही जगाला मार्ग दाखवणारे असे व्यथित झालेले पाहवत नाही. मी सांगतो तुम्हाला. विचारा काय जाणायचे आहे तुम्हाला ?


 कृष्ण : हि टिवटिव म्हणजे काय?  ती कशी केली  जाते?   ती करण्याचे मार्ग कोणते?  आणि तिचा समाज मनावर इतका पगडा का आहे?


पेंद्या:  साध्य शब्दात सांगायचे तर Social मीडिया वर केलेली वटवट म्हणजे टिवटिव. आपण एक  message टाकला कि तो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि इतर लोक त्याला उत्तर देऊ शकतात. याला दोन व्यक्तींमधले प्रत्यक्ष अंतर किती आहे याचा काहीच फरक पडत नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्हाला संपर्कात राहता येते 

कृष्ण : हे चांगले आहे.. म्हणजे मला आता वृन्दावनाच्या बाहेरच्या गोपिकांपर्यंत पोहोचता येईल?

पेंद्या : अगदी बरोबर... 


कृष्ण: अरे वा ... मला अजून सांग ना याबद्दल... 

(पेंद्या  बोलत राहतो... कृष्ण ऐकत राहतो...)

अभिजीत कुंभार

Sunday, June 14, 2020

सुशांत सिंग राजपूत



एक देखणे रूप... सगळ्यांना हवे हवे से वाटणारे. त्यावर मोहिनी घालणारे स्मितहास्य. त्याचा चैतन्यपूर्ण वावर. एखादे परिपूर्ण व्यक्तिमत्व कसे असावे या प्रश्नाचे उत्तर जणू त्याच्यामध्ये लोकांना सापडले असावे.  सामान्यांच्या आकांक्षांचे मूर्तिमंत रूपच. पण अशाच व्यक्तिमत्वाच्या अचानक जाणे हे सगळ्यांना चटका तर लावून गेलेच पण त्याच वेळी अनेक अनुत्तरित प्रश्न जागे करून गेले.
का ?  असे कसे शक्य आहे? तू सुद्धा ? असे किती तरी  आपुलकीतुन निर्माण झालेले  प्रश्न चाहत्यांच्या मनामध्ये घोळत असतील आणि काही दिवस ते घोळत राहतील.
 खरं सांगायचं झाले तर आपल्याला खरी उत्तरे कधीच सापडणार नाहीत. सर्व जण शक्यता वर्तवतील आणि काही जण आपलीच शक्यता खरी कशी आहे हे आपापल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतील. पण जसा या बातमीवर विश्वास बसत नाही तसाच त्या शक्यतांवर विश्वास बसेल असे  नाही. एखाद्याच्या जीवनात काय घडत असेल, त्याच्या मनाला कोणत्या चिंतांनी ग्रासले असेल हे ती व्यक्ती सोडून कुणीही खरे उत्तर देऊ शकणार नाही. आणि ज्या क्षेत्रामध्ये परिपूर्णतेचा मुखवटा हीच अस्तित्वाची गरज असते त्या क्षेत्रामध्ये तर हे सत्य मुखवट्याच्या मागे कायमचे कोंडले  गेलेले असते. आणि मनातली  खदखद, घुसमट मोकळी करण्याचा कदाचित एकच मार्ग उरत असेल. आता तर एक मुखवटा कायमचा  निःशब्द झाला आहे.   त्याच्या चाहत्यांना आता एक नवा चेहरा शोधावा लागेल स्वतःच्या आकांक्षा ज्याच्यामध्ये पाहता येतील असा.  
                 अभिजित कुंभार

Saturday, May 30, 2020

मित्र


­­                                                 
जीवन हा एक प्रवास असतो. अगदी रुक्षपणे बोलायचे झाले तर बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्तेपर्यंतचा अंतिमतः मृत्यूमध्ये संपणारा तो प्रवास असतो. पण तरीही मार्गक्रमण करत असताना मृत्यू हे आपले अंतिम ध्येय कधीच नसते. किंबहुना तो आपल्या ध्यानी मनी देखील नसतो. आपली ध्येये हि भौतिक असतात. जसे कि मला श्रीमंत व्हायचे आहे, गाडी बंगला हवा आहे, किंवा मला लोकांची सेवा करायची आहे वगैरे वगैरे. आणि जीवनभर आपण हि उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या मागे असतो. ते कसे साध्य  कसे करता येईल    येईल याचा प्रयास आपले जीवन आणि मन पूर्ण वेळ व्यापून टाकत असतो. हे सगळे करत असताना आपल्या अंतर्मनामध्ये काही प्रश्न, काही शंका, काही द्वंद्व, काही अपेक्षांची पूर्तता झाल्याचे नैराश्य अविरतपणे वावरत असतात. त्यांची उत्तरे, त्यांचे समाधान आपण मिळवण्याचा प्रयत्न आपण करत जातो. त्या उत्तरांमधून आणि जीवनातल्या प्रसंगातून येणाऱ्या अनुभवांमधून आपले व्यक्तिमत्व घडत जाते, उजळत जाते.
कित्येकदा मनातला हा अंतर्गत झगडा अस्वस्थ करत असतो. तो बाह्य जगाला दिसत नाही. पण त्यामुळे  येणारा  अपुरेपणा मनामध्ये वास करत असतो. अशा वेळी आपण भौतिक गोष्टींपेक्षा मानसिक आणि अध्यात्मिक गोष्टींचा शोध घेऊ लागतो. पण कधी कधी काही व्यक्तिमत्वे आपल्या जीवनात येतात ज्यांच्या संवादाने हे झगडे शमून जातात. आपल्या मध्ये खोलवर दडलेल्या आपल्याच प्रतिभेचे दर्शन घडवतात आणि आपली खरी ओळख शोधण्यात मदत करतात.  मग आपला नवा प्रवास सुरु होतो.  तो रुक्षपणाचा नसतो, अथवा फक्त भौतिक गोष्टींसाठीचा नसतो. तर हा प्रवास अधिक श्रीमंत करणारा असतो. जीवनाच्या एका टप्प्यावर प्रत्येक जण अशा मित्राच्या अथवा मैत्रिणीची अपेक्षा करू लागतो. अशी अपेक्षा पूर्ण होतेच असे नाही. असा संवाद साधण्यासाठीचा मानसिक समतोलपणा असणारी आणि स्वतःबद्दल विचित्र संकल्पना ना बाळगणारी व्यक्तिमत्वे क्वचितच असतात. आणि असे व्यक्तिमत्व आपल्या जीवनात आले असेल तर त्याबद्दल मन नेहमीच कृतार्थ असते. 
                                                                                                              अभिजित कुंभार