गुरु
आपल्या
जीवनात आपल्याला शिकवणारे कित्येक जण भेटतात. कुणी तरी
चालायला शिकवते, कुणी बोलायला. कुणी
अक्षर ओळख करून देते.
कुणाकडून आपण गणित, विज्ञान
शिकतो. तर काही जण
आपल्यावर चाली रीतींचे संस्कार
करतात. आणि कित्येकशा गोष्टी
आपण स्वतःहून शिकतो. काही निरीक्षणातून, काही
अनुभवातून, काही वाचनातून, काही
प्रयोगातून तर काही अंदाजातून.
ठरवले तर शिक्षणाची प्रक्रिया
हि अखंडपणे चालत राहू शकते.
नाही तर एखादी degree मिळाली
कि आत्मा संतुष्ट होऊन शिकणेच थांबू शकते. आणि मग आपण
अधिकारवाणीने सगळ्याच गोष्टींवर भाष्य करू लागतात. आपल्या
आजूबाजूला असे पुष्कळ जण
भेटतील. म्हणूनच
थोडे गाणे शिकले कि
इतरांना शिकवणी घेणारे विद्वान गायक कित्येक भेटतीलच.
अगदी लहान वयातच गीता,
ज्ञानेश्वरी मुखोद्गत करून प्रवचने देणारे
हि काही भेटतील. हे
करणे योग्य कि अयोग्य हा
प्रश्न वेगळा. पण इतरांना शिकवण्याची
प्रचंड उर्मी आम्हा सर्वांच्या मनात जागी असते
हे खरे. त्यातूनच
आपल्याला जीवनातले गुरुचे महत्व जाणवते. कारण गुरु ला
महत्व नाही दिले तर
आपल्याला कोण विचारणार?
प्रत्यक्षात मात्र गुरुचे महत्व असण्याचे कारण पूर्णपणे उलटे
आहे. जेव्हां आपण प्राथमिक गोष्टी
शिकून जीवनाचा , स्वतःचा शोध घेऊ लागतो.
आणि स्वतःचे जीवनातले उद्दिष्ट ठरवू लागतो तेव्हा
अनेक प्रश्नांचे डोंगर आपल्या समोर उभे राहतात.
त्या प्रश्नांची उत्तरे कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये बंदिस्त झालेली नाही आहेत. त्या
प्रश्नांशी होणारा
झगडा हा आपला स्वतःचाच
उरतो. अशा वेळीच एखादा
विवेकानंद गुरुच्या शोधात निघतो. एखादा भीमसेन गाणे शिकण्यासाठी घर सोडून गुरूच्या
घरात आश्रय घेतो किंवा कट्यार
काळजात घुसली नाटकातला ( चित्रपटातला नव्हे ) नायक खान साहेबांच्या
घराबाहेर जाऊन त्यांचा रियाझ ऐकत
बसतो. जेव्हा स्वतः आपण शोध घेऊ
लागतो तेव्हा
गुरु ची खरी गरज
भासू लागते. एखादा थोपवलेला गुरु हा खरा
गुरु असेलच असे मात्र नाही.साधनेची तयारी असलेला शिष्य आणि त्याला हवे
ते देऊ शकणारा गुरु
असेल तरच तसे नाते
तयार होऊ शकते. नाही
तर स्वघोषित गुरु आपण सांगतो
ते कसे बरोबर हे
पटवून देत शिष्याची दिशाभूल
करत बसतो. आपल्या समाजात अशांचेच स्तोम वाढलेलं दिसून येईल. 'गुरुविण
कोण दाखवील वाट' हे ऐकतच
आपण मोठे झालेलो असतो.
त्यामुळे आपण गुरु हवाच
हे गृहीत धरून एखादा गुरु
नेमून घेतो. आणि मग स्वघोषित
गुरू शिष्याला गोंधळवण्याचे काम सुरु करतो.
म्हणूनच शिष्याने देखील डोळसपणे, चौकसपणे गुरुची परीक्षा घेत राहणे हे
तितकेच योग्य. एकच
तर जीवन असते. परत जन्म होणार
असे गृहीत धरले तरी हा
जन्म सार्थकी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण केला पाहिजे.
त्या मार्गात जर गुरूच अडथळा
वाटत असेल तर तो
बदलण्यात काहीच वाईट नाही. आणि
समजा गुरु मिळालाच नाही
तर स्वतःच्या साधनेने हवे ते साध्य
एखादा एकलव्य करू शकतो. तो
मार्ग खडतर असले, त्यात
वेळ लागेल इतकेच. पण अशा वेळी
गुरूच्या मर्यादांनी शिष्याला मर्यादित करणे हे
योग्य ठरत नाही. गुरुचे
खरे काम योग्य मार्ग
दाखवणे इतकेच असते. पुढचा मार्ग हा शिष्याने स्वसाधनेने
चालू ठेवायचा असतो
गुरु
अनेक प्रकारचे असतात. काहींना विशिष्ट विद्यार्थ्यांवर खास प्रेम असते,
किंवा त्यांचे पूर्वग्रह असतात
किंवा
त्यांचा अहं असतो आणि त्यामुळे
खऱ्या साधकाला शिष्य करतीलच असे नाही. जसे द्रोणाचार्यांचे अर्जुनावर
होते. त्यांचे विद्येवर प्रेम नव्हते. नाही तर त्यांनी
एकलव्याला आपल्या पदराखाली घेतले असते. अशाच काहीशा कारणामुळे कर्ण परशुरामांचा शिष्य होऊ शकला नाही.
काही गुरु स्वतःच गोंधळले
असतात. मग शब्दच्छल करून
आपल्याला खूप काही माहीत
आहे असा आव आणत
शिष्याना स्वतःच्या पदरी बांधून ठेवतात.
पण तिथे पोहोचण्याचा मार्ग
ते उलगडवून दाखवू शकत नाहीत. काही
गुरु तर ज्ञानाचे चार
शब्द वाटून दक्षिण मिळवण्यातच धन्यता मानतात. आपल्या देशामध्ये सगळ्याच क्षेत्रात
असे गुरु भेटतील. शिष्याने मात्र गुरु बद्दल आणि
त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानाबद्दल डोळस आणि चौकस
असले पाहिजे. एखादा शिष्य जर पात्र असेल
तर तो गुरूच्या पात्रतेला
आव्हान देऊ शकतो.
आणि गुरु नाहीच मिळाला
तर स्वतःच गुरु बनू शकतो.
जोपर्यंत साधकवृत्ती येत नाही तोपर्यंत
खऱ्या गुरुची गरज भासत नाही.
आणि एकदा ती गरज
भासली तर तो सहज
मिळत नाही. आणि म्हणूनच गुरु
महत्वाचा ठरतो
अभिजीत कुंभार
No comments:
Post a Comment