कृष्ण: मला वाटते मला माझी बासरी बदलली पाहिजे....
पेंद्या: ( फोन मधून डोके बाहेर काढून ) भगवान असे का वाटले तुम्हाला? तुमचे बासरी चे सूर अजूनही तसेच सुरिले उमटतात. हे बघा तुमच्या आजूबाजूला गायी कशा जमल्या आहेत...
कृष्ण: ते ठीक आहे रे.. पण?
(फोन वर बीप वाजतो )
पेंद्या: (फोन मध्ये पाहात ) पण काय प्रभू?
कृष्णा: पण एक ही गोपिका कशी काय आली नाही? किती तरी दिवस हे चालू आहे...
पेंद्या: देवा कर्म करत राहा... फळाची अपेक्षा करू नका ...
कृष्ण: ( गांगरून) म्हणजे म्हणायचे काय तुला? अरे… इतकी चांगली बासरी वाजवतो. त्याचे फळ इतरांना मिळत नाही आहे त्याचे मला वाईट वाटत आहे
पेंद्या: ( मान हलवत ) कळले देवा कळले... ( हसत) तुमच्या मनात काय चालले आहे ते .. कळले.
कृष्ण: ( हिरमुसल्या स्वरात) म्हणून म्हटले कदाचित बासरीच बदलून बघावी ....
(फोन वर बीप वाजतो )
पेंद्या: तसे काही नाही देवा... तुम्ही चिंता करू नका ... (फोन मध्ये पाहात ) स्थितप्रज्ञ राहा
कृष्ण: मग असे काय झाले कि कलयुगातल्या गोपिकांना माझी बासरी खेचून आणत नाही पूर्वीसारखी. तुझे पण काय चालले आहे? तुझे माझ्या कडे पूर्ण लक्ष नाही दिसत आहे. मगापासून बघतोय मी त्या यंत्रामधून टिवटिव आवाज येत आहे. आणि तू सारखा त्यात बघत आहेस. काय आहे हे?
पेंद्या: काही नाही हे आमचे असेच करमणुकीचे साधन आहे.. तुमचे चालू द्या
कृष्ण: काय चालू द्या?
पेंद्या : करा काही तरी भव्य दिव्य, चमत्कारी असे काहीसे . आम्हाला करू द्या आम्हाला जे जमेल ते
कृष्ण: म्हणजे?
पेंद्या: तुमचे कसे आहे... तुम्ही काही हि करता ते सगळेच अगदी सखोल आणि अगाध असते. तुमच्या बालपणाचा खट्याळपणा, तुमचे बासरीचे सूर, राधे बरोबरचे नाते असू दे.. तुम्ही म्हणजे त्रेता युगातले alpha-male . सगळे कसे भव्य दिव्य. आता हेच बघा ना अर्जुन नुसता म्हणाला कि दादा मला लढाईत शिरायचे टेन्शन आले आहे. तर तुम्ही आख्खी गीता सांगून टाकली. अहो तेव्हां रणांगणावर भर उन्हात शस्त्र घेऊन उभ्या असलेल्या सैनिकांचा काही विचार केलात कधी? त्यांची काय अवस्था झाली असेल? बासरी वाजवून सगळ्या गोपिकांना आमंत्रित करायचा तेव्हाण शेजारी राहणाऱ्या मुलांना काही scope ठेवला तुम्ही?
तुमची बासरी ऐकत त्या तुमच्या मागे आणि आम्ही त्यांच्या मागे. आमच्याकडे लक्ष कोण देत होते? सामान्यांचा विचार कधी केलात तुम्ही?
कृष्ण: अरे मित्र तुझा गैरसमज होतो आहे..
पेंद्या: देवा तुम्ही कधीच माझ्या सारख्या सामान्य मुलांचा विचार केला नाहीत
कृष्ण: अरे असे कसे म्हणतोस? आठव बघू आपण गोपाळ काला करायचॊ.. मग विटी दांडू खेळायचो. किती धम्माल करायचो आपण
पेंद्या: लहानपणी सगळे ठीक होते हो..
कृष्ण : मग?
पेंद्या: आपण सगळे वयात आलो आणि तुम्ही सगळे विसरून गेलात
कृष्ण : असे नाही रे.. मला या जगाची चिंता होती.. म्हणून मला हे सगळे करावे लागले.
पेंद्या : वा रे वा ... जगाची चिंता होती तर माझ्या सारख्या साध्या मित्र ची कधी चिंता नाही वाटली तुम्हाला?
कृष्ण: नको रे असा गैरसमज करून घेऊ.. आठव आपण लहान पणी सगळ्यांचा रोष पत्करून कसा लोणी चोरायचो.. त्या लोण्याची शपथ आहे तुला.. सांग काय आहे हे सगळे?
पेंद्या: देवा तुला मी सांगितले तर तू परत त्यात पारंगत होशील.. आणि आमची अवस्था पूर्वी सारखी होईल.. आता कुठे सामान्य माणसाला आवाज फुटलाय. तुम्ही तो पण घेऊन टाकाल
कृष्णा: असे नाही होणार. तुला काय हवे ते सांग.. तुला काही दुःख आहे का?
पेंद्या : देवा तुझा मित्र म्हणून तू सुदामा ला मोठा महाल बांधून दिला पण मला विसरला.
कृष्ण : ( हसत) मग तुला पण एक बांधून देतो..
पेंद्या : नक्की?
कृष्ण: हो नक्की
पेंद्या : बघ हां.. हल्ली प्रॉपर्टी चे भाव वाढले आहेत सगळीकडे..
कृष्ण: अरे हो हो.. मी देईन तुला मोठा बंगला... मी बोलतो मोंदींशी.. ते पण माझे भक्त आहेत.. नाही म्हणणार नाहीत. एखादी बेनामी प्रॉपर्टी ला तुझे नाव द्यायला सांगतो...
पेंद्या: Yess ....
कृष्ण: आता तरी मला मार्गदर्शन करशील?
पेंद्या: देवा.. आमच्या सारख्याना आता कुठे जरा आवाज मिळाला आहे. त्याच्या मध्ये तुम्ही ढवळा ढवळ करणार. आम्ही लहान होतो तेव्हा मत व्यक्त करण्यासाठी एक तरी उच्च शिक्षित असावे लागायचे किंवा अगदी विचारवंत असावे लागायचे. आता कुठे आमच्या सारख्याना वाचा फुटली आहे.. आम्ही काही व्यक्त केले तर लाख भर लोकांपर्यंत पोहोचू शकतो
कृष्ण: याचेच तर मला कुतूहल वाटते आहे. मी या जगाला जगण्याचा मार्ग सांगितला. पण आता पाहतो तर सर्व मनुष्यजात भौतिक आकर्षणामध्ये अशी काही अडकून पडली कि मला कळत नाही कि यांच्यापर्यंत माझा संदेश कसा पोहोचवू
पेंद्या: गप्प बसा ... तुमचा संदेश म्हणे... अहो किती क्लिष्ट करता कुठला हि संदेश.. किती लोकांनी तुमच्या गीतेवर टीका लिहिली, भाषांतरे लिहिली. तरी अजून आम्हाला कळली नाही ती. तुम्ही संदेश नाही दिला. तर वैचारिक गोंधळ निर्माण केला नुसता..
कृष्ण : अरे रे काय बोलतोयस हे.. माझ्या काळजाला वेदना होत आहेत हे सगळे ऐकून. माझ्या बद्दल या जगात काहीच श्रद्धा उरली नाही का?
पेंद्या: तुमच्या वर श्रध्दा, भक्ती सगळे काही आहे. त्याची चिंता नका करू.. एकीकडे TV चॅनेल्स आणि दुसरीकडे तुमची मंदिरे वाढतच आहेत. घरोघरी तुमच्या मुर्त्या आहेत. सगळ्यांना राधा कृष्णा सारखे प्रेम हवे आहे.. जन्माष्टमी ला दही हंडीला थरावर थर चढतात. सगळी कडे कसे भक्तिपूर्ण वातावरण वाढतच आहे. पण ....
कृष्ण: पण ? पण काय?
पेंद्या : कुणाला हे विचारू नका कि तुम्ही गीते मध्ये काय सांगितले आहे?
कृष्ण : (छाती वर हात ठेवून कळवळून ) हे काय ऐकतो आहे मी?
पेंद्या: देवा... तुम्ही स्थितप्रज्ञ राहा. भावनांवर नियंत्रण ठेवा.. तुम्ही जगाला मार्ग दाखवणारे असे व्यथित झालेले पाहवत नाही. मी सांगतो तुम्हाला. विचारा काय जाणायचे आहे तुम्हाला ?
कृष्ण : हि टिवटिव म्हणजे काय? ती कशी केली जाते? ती करण्याचे मार्ग कोणते? आणि तिचा समाज मनावर इतका पगडा का आहे?
पेंद्या: साध्य शब्दात सांगायचे तर Social मीडिया वर केलेली वटवट म्हणजे टिवटिव. आपण एक message टाकला कि तो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि इतर लोक त्याला उत्तर देऊ शकतात. याला दोन व्यक्तींमधले प्रत्यक्ष अंतर किती आहे याचा काहीच फरक पडत नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्हाला संपर्कात राहता येते
कृष्ण : हे चांगले आहे.. म्हणजे मला आता वृन्दावनाच्या बाहेरच्या गोपिकांपर्यंत पोहोचता येईल?
पेंद्या : अगदी बरोबर...
कृष्ण: अरे वा ... मला अजून सांग ना याबद्दल...
(पेंद्या बोलत राहतो... कृष्ण ऐकत राहतो...)
अभिजीत कुंभार
👌😀
ReplyDelete