Saturday, May 30, 2020

मित्र


­­                                                 
जीवन हा एक प्रवास असतो. अगदी रुक्षपणे बोलायचे झाले तर बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्तेपर्यंतचा अंतिमतः मृत्यूमध्ये संपणारा तो प्रवास असतो. पण तरीही मार्गक्रमण करत असताना मृत्यू हे आपले अंतिम ध्येय कधीच नसते. किंबहुना तो आपल्या ध्यानी मनी देखील नसतो. आपली ध्येये हि भौतिक असतात. जसे कि मला श्रीमंत व्हायचे आहे, गाडी बंगला हवा आहे, किंवा मला लोकांची सेवा करायची आहे वगैरे वगैरे. आणि जीवनभर आपण हि उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या मागे असतो. ते कसे साध्य  कसे करता येईल    येईल याचा प्रयास आपले जीवन आणि मन पूर्ण वेळ व्यापून टाकत असतो. हे सगळे करत असताना आपल्या अंतर्मनामध्ये काही प्रश्न, काही शंका, काही द्वंद्व, काही अपेक्षांची पूर्तता झाल्याचे नैराश्य अविरतपणे वावरत असतात. त्यांची उत्तरे, त्यांचे समाधान आपण मिळवण्याचा प्रयत्न आपण करत जातो. त्या उत्तरांमधून आणि जीवनातल्या प्रसंगातून येणाऱ्या अनुभवांमधून आपले व्यक्तिमत्व घडत जाते, उजळत जाते.
कित्येकदा मनातला हा अंतर्गत झगडा अस्वस्थ करत असतो. तो बाह्य जगाला दिसत नाही. पण त्यामुळे  येणारा  अपुरेपणा मनामध्ये वास करत असतो. अशा वेळी आपण भौतिक गोष्टींपेक्षा मानसिक आणि अध्यात्मिक गोष्टींचा शोध घेऊ लागतो. पण कधी कधी काही व्यक्तिमत्वे आपल्या जीवनात येतात ज्यांच्या संवादाने हे झगडे शमून जातात. आपल्या मध्ये खोलवर दडलेल्या आपल्याच प्रतिभेचे दर्शन घडवतात आणि आपली खरी ओळख शोधण्यात मदत करतात.  मग आपला नवा प्रवास सुरु होतो.  तो रुक्षपणाचा नसतो, अथवा फक्त भौतिक गोष्टींसाठीचा नसतो. तर हा प्रवास अधिक श्रीमंत करणारा असतो. जीवनाच्या एका टप्प्यावर प्रत्येक जण अशा मित्राच्या अथवा मैत्रिणीची अपेक्षा करू लागतो. अशी अपेक्षा पूर्ण होतेच असे नाही. असा संवाद साधण्यासाठीचा मानसिक समतोलपणा असणारी आणि स्वतःबद्दल विचित्र संकल्पना ना बाळगणारी व्यक्तिमत्वे क्वचितच असतात. आणि असे व्यक्तिमत्व आपल्या जीवनात आले असेल तर त्याबद्दल मन नेहमीच कृतार्थ असते. 
                                                                                                              अभिजित कुंभार


1 comment:

  1. खूप छान!!!! असाच लिहीत रहा आणि आम्हाला खूश कर☺️
    मला असं वाटतं की समाधानी व्यक्ती लऊकर हे समजू शकेल. मराठी लिखाणात भूल चूक झाल्यास माफी.

    ReplyDelete