एखाद्या
ठिकाणाची भौगोलिक परिस्थिती आणि तिथली माती
हि तिथले जीवनमान ठरवत असते. प्रत्येक ठिकाणच्या मातीचा पोत वेगळा, तिचा
रंग वेगळा, तिथली पोषकतत्वे वेगळी. माती मधल्या घटक तत्वावरून ठरते
कि तिथे काय उगवू
शकते आणि भौगोलिक परिस्थितीवर
ठरते कि तिथे काय
टिकेल, काय बहरेल. कुठली
पिके जोमाने उगवणार, कुठल्या फळांची झाडे बहरणार, कुठली
फुले उमलणार हे सगळी त्या
मातीवर ठरत असते. मग
एका ठिकाणचे आंबे गोड़ लागतात,
तर एका ठिकाणची वांगी
चविष्ट लागतात, कुठे अवोकाडो उगवतो
तर कुठे चहा कॉफीचे
मळे उगवू शकतो , आणि
कुठे द्राक्षांचे मळे पसरतात.
या
गोष्टींचा साहजिकपणे तिथल्या जीवनमानावर प्रभाव पडताना दिसून येतो. तिथली जीवनपद्धती, वर्षाचे चक्र, तिथले सण हे सगळे
ठरत जातात. प्रत्येक ठिकाणच्या घरांचे रंग, घरांची रचना,
तिथली खाद्यसंस्कृती, तिथले खेळ
यांच्या रूपात त्या ठिकाणाची वैशिष्ट्ये
जपत संस्कृती फुललेली आपल्याला दिसून येते. एका
प्रकारे त्या संस्कृतीमधून माती
आपली अभिव्यक्ती जपत असते.
माती
ने अशा कित्येक संस्कृती
पोसल्या, फुलवल्या
आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या
पोटात दडवल्या सुद्धा. मग कधी जमिनीत दडलेल्या संस्कृतीच्या खुणा बाहेर
पडतात. कुठे जुन्या काळातल्या प्राण्याचे सांगाडे वर येतात, कुठे जीवाश्म सापडते, कुठे
देवाची मूर्ती मिळते, तर कुठे भांडी कुंडी मिळतात, कुठे नाणी मिळतात. कधी मंदिरे मिळतात तर कधी मोठाली शहरे...
या सगळ्यातून
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आधीच्या संस्कृत्या या निसर्गाशी जोडल्या गेल्या होत्या,
मातीच्या जवळ होत्या. जीवनपद्धती मुख्यत्वे शेतीवर आधारलेली होती. आता काय दिसते? लहानपणी घरासमोर जी रिकामी जागा होती ज्या मध्ये आम्ही
मैदानी खेळ खेळलो तिथे आता बंगले उभे राहिले
आहेत. दोन गावांमध्ये असलेल्या शेत जमिनी विकल्या जाऊन तिथे घरांच्या रांगाच रांगा
लागल्या आहेत. सर्वत्र जंगल तोड झाली आहे, डोंगर कापले गेले आहेत, खनिज उत्पत्तीसाठी
जमीन पोखरली गेली आहे. मैदानी खेळांची जागा आता इनडोअर स्टेडियम्स मध्ये होणारे खेळ
अथवा कॉम्पुटर गेम्स नि घेतली आहे. शेतकरी
शिकून शेत विकत आहे आणि मोठ्या कंपन्या शेती करत आहेत. थोडक्यात काय तर माणूस हळू हळू मातीपासून
दुरावला आहे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये घरातली येणारी अनावश्यक धूळ इतकाच काय तो माती
शी संपर्क राहील कि काय असे वाटते. आपण जशी धूळ झटकतो तसेच माती ने आपल्याला झटकले
तर?
एखादा
प्रलय आल्यावर जीवसृष्टी नष्ट होणे आणि
काही काळाने एक नवी जीवसृष्टी
उपजणे हा सृष्टीचा नियम
आहे. कारण माती जिवंत
असते. मागच्या जीवसृष्टीचा अंश मातीमध्ये मिसळलेला
असतो. ते जीव तत्व
पोषक वातावरण झाल्यावर पुन्हा वाढ घेऊ लागते.
समजा असा एखादा प्रलय
आला. तो येणार नाही
असे समजू नये. एखादा
व्हायरस जर हाहाकार माजवू
शकतो तर प्रलय येणे
अगदी अशक्य नाही. आणि जर असा
प्रलय आला तर माती
मध्ये काय मिसळले जाईल?
मोठं मोठाले दुर्गंधीयुक्त डम्पिंग
यार्डस, प्लास्टिक च्या वस्तू, इलेक्ट्रिक
कार्स च्या batteries , रासायनिक
waste, सिमेंट काँक्रेटची घरे, डांबराचे रस्ते.
हे सर्व माती मध्ये
मिसळून नवी सृष्टी उभी
राहील? मनुष्यासाठी मातीचा जिवंतपणा जाऊन फक्त
धूळ रूपात च शिल्लक राहत असेल तर माती ला अथवा जमिनी ला आताच्या प्राण्यांचे मुख्यत्वाने
मनुष्याचे काय महत्व वाटत असेल? माती देखील दुरावली असेलच ना?
अभिजीत कुंभार
No comments:
Post a Comment